लोणी-काळभोर, पुणे.
स्वतंत्र प्रतिनिधी : अमिता कदम ।
प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील ।
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे।
पूर्व हवेलीमध्ये महिलांसाठी एक हक्काचा मंच म्हणून तेजस्विनी संस्थेकडे पाहिले जाते. २०१४ मध्ये तेजस्विनी संस्थेच्या वतीने सन्मान स्त्रीशक्तीचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखिका व माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना तेजस्विनी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यातील "एक पूर्ण अपूर्ण "हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे. यातील एक धडा बारावीच्या इंग्रजी पुस्तकात समाविष्ट केलेला आहे.यापैकी "आईबाबांची शाळा"(मार्गदर्शनपर), "आयुष्य जगताना एक दिवस जीवनात"(अनुभवकथन),रात्र वणव्याची कांदबरी, मैत्र(ललित लेख) यांचा समावेश आहे.
त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यात केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखिका पुरस्कार, राष्ट्रीय चरित्र पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, मातूवंदना पुरस्कार इ.पुरस्कारांचा समावेश आहे.
या कार्यक्रमध्ये ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणच्या सर्व महिलांशी आस्थेने विचारपूस करून त्यांनी सर्वांकडून थोड्या थोड्या वस्तू खरेदी केल्या होत्या. या महोत्सवात ग्रामीण भागातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नीला सत्यनारायण यांनी सर्व रांगोळ्या पाहून सर्व कलाकारांचे खूप कौतुक केले होते. महिला सबलीकरण या विषयावर त्यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. काल त्यांच्या अचानक निधनाने पूर्व हवेलीतील अनेक महिलांना त्या आठवणी जाग्या झाल्या.