गुरूपौर्णिमेचे महत्त्व- गुरुपौर्णिमेची कहाणी प्राध्यापिका/ लेखिका अमिता कदम यांच्या जुबानी.......


गुरूपौर्णिमेचे महत्त्व- गुरुपौर्णिमेनिमित्ताने टाकलेला प्रकाश.

           "गुरुपौर्णिमा" हा सण आषाढ महिन्यात येतो. या दिवशी गुरुची आदराने पूजा केली जाते. तसेच या दिवशी आपले पहिले  पूजनीय गुरु म्हणजेच आपले आईवडील यांची सुद्धा यावेळी पूजा करतात. व्यास ऋषी हे आद्य गुरु आहे.त्यामुळे या पौर्णिमेला"व्यास पौर्णिमा"असे सुद्धा म्हटले जाते.ज्यांनी महाभारत ,पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा ,त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी ,आचार्य अद्याप झालेले नाहीत,अशी श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नाही तर महर्षी व्यास यांना  भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जाते.ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र ,मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.ज्ञानियांचा राजा म्हणून आपण ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना "व्यासांचा मागोवा घेतू"असे म्हणून सुरुवात केली.
           प्राचीन काळापासून हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. गुरु हा ज्ञानाचा सागर असतो. आपण ज्यांच्याकडून विद्या ,ज्ञान घेतो ,जे आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात त्यांना वंदन करायला पाहिजे. पूर्वापार ही गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. अनेक अशा गुरुशिष्याच्या जोडया आहेत. उदा-द्रोणाचार्य -अर्जुन, कूष्ण-सुदामा इ.
        आई ही सर्वात पहिली गुरु असते. ती आपल्या मुलांना योग्य संस्कार देते. व योग्य व्यक्ती बनण्यास मदत करते. नंतर शाळेत शिक्षक आणि आपल्यासाठी एक महत्त्वाचा गुरु असतो तो म्हणजे "निसर्ग".आपण या आपल्या सर्व गुरुंचा सन्मान केला पाहिजे.गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे. परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. पौर्णिमा म्हणजे प्रकाश.गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करावयाची तो हा दिवस.आपल्या गुरुच्या प्रति कूतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. अंध:काराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम गुरु करत असतो. जो सकल जीवास चांगले शिकवतो,चांगले संस्कार देतो तो म्हणजे गुरु.
"गुरुब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर : ।।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: ।।"
       हा श्लोक आपण रोज प्रात:स्मरणात म्हणतो. परंतु यात किती खोल अर्थ दडलेला आहे. गुरु हे साक्षात ब्राह्म,विष्णू आणि शिव आहेत. ते प्रत्यक्षात परब्रह्मच आहेत,अशा श्रीगुरुंना मी नमन करतो,असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्ताला ज्ञानाची प्राप्ती होते ती केवळ गुरुमुळेच.त्यामुळे व्यक्ती कितीही मोठा जरी असला तरी त्याला मिळणारे ज्ञान ,आत्मज्ञान या सर्वाच्या प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असते आणि गुरु कधीही आपल्या शिष्यामध्ये गरीब-श्रीमंत असा भेद करत नाही. तो सगळयांना सारखेच मानतो.प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली ,त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढे जात मोठ्या झाल्या आहेत. अशावेळी एकलव्याचे स्मरण होणे साहजिकच आहे ,कारण गुरूंने नाकारुन सुद्धा त्यांनी आपल्या गुरुंचा पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला. या मागचा भावार्थ असा आहे की आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम परिश्रम तर हवे पण त्याबरोबर श्रद्धेची आणि विश्वासाची जोड हवी आहे. आणि हाच विश्वास आणि प्रेरणा आपल्याला गुरू देतात.गुरु दत्तात्रयांनी एकूण २४ गुरु केले,असे म्हणतात आणि प्रत्येक गुरुंकडून चांगल्या गोष्टी घेऊन स्वतः ला सिद्धपद प्राप्तीसाठी तयार केले.
       असे मानले जाते की, जेव्हा प्राचीन काळात विद्वानांनी आपल्या गुरूकडून संपूर्ण शिक्षण घेतले तेव्हा या वेळी त्यांनी आपल्या उपासनेत दक्षिणा देऊन आपल्या गुरुची उपासना केली. आश्रमात ,उपासनेची आणि सेवेची विशेष सेवा वापरली जात
असे. संपूर्ण भारतात हा उत्साह आणि आदराने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा उत्सव गुरुला आदर आणि समर्पण करण्याचा सण आहे,असे मानले जाते की या दिवशी गुरुंच्या हदयाच्या उपासनेला गुरुची सुरुवात करण्याची कूपा होते, यावेळी बरेच लोक त्यांच्या गुरुसाठी उपवास करतात.
         गुरुपौर्णिमा हा सण भारतातील प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. यावेळी गुरुविषयी कूतज्ञता व्यक्त करुन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो.भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गुरुच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वर यांनी आपले वडीलबंधू निवूत्तीनाथ यांना आपले गुरु मानले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत.नामदेवांचे गुरु विसोबा खेचर होते. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले जाते.
      महर्षी व्यास यांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे,अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. प्राचीन काळापासून सुरु झालेली ही परंपरा आज २१ शतकात सुद्धा कायम आहे आणि कितीही आधुनिक काळ आला तरी ही परंपरा कधीही संपणार नाही. फक्त एकाच दिवशी आपल्या गुरुविषयी आदर आणि सन्मान व्यक्त करून उपयोग नाही तर आयुष्यभर गुरुविषयी कूतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. आईवडील आणि गुरू यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही,कारण कोणतीही अपेक्षा न करता हे आपल्याला ज्ञान आणि साथ देत असतात. आपण आपल्या गुरुला काही दिले नाही तरी चालेल परंतु त्याने जी शिकवण ,जे संस्कार आपल्याला दिले आहे त्याचा अनादर किंवा विस्मरण आपल्याकडून होणार नाही याची काळजी आपण घेतली तर ती आपल्याकडून आपल्या गुरुसाठी गुरूदक्षिणा ठरेल.
    आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या समस्त गुरुंवर्याना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी राहावे ही मनपूर्वक प्रार्थना. आज माझ्या यशात माझे आईवडील ,माझे कुटुंब यांचा जेवढा सहभाग आहे तेवढा सहभाग मला आतापर्यंत लाभलेले माझे शिक्षक, सर्व सहकारी यांचाही मोलाचा वाटा आहे आणि अशावेळी त्याचे स्मरण होणे महत्त्वाचे आहे.
       "गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"💐

लेखिका
अमिता कदम
प्राध्यापिका,
(Venus world school)
हडपसर, पुणे