सांगली : गावागावांत होणारी छोटी साहित्य संमेलने ऊर्जा देतात. पुस्तकांचे वाचन बंद होऊन सध्या सोशल मीडियावर जे वाचले जात आहे, ते घातक आहे. गटबाजी टाळून प्रेमाने जग जिंकता येते यावर विश्वास ठेवा, असे प्रतिपादन दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी केले. वाटेगाव येथील सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 31 व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनेक घटनांना उजाळा दिला. मंजुळे म्हणाले,तोच दलित ज्याचे शोषण होते. त्याला जातीची गरज नाही. दलित म्हटले, की मला पहिल्यांदा महिला आठवतात. सतत सगळे संकुचित करण्याचा प्रयत्न असतो. ‘फॅंड्री’मध्ये मला दगड वेगळ्या अर्थाने अपेक्षित आहे. हिंसा गरजेची नाही. हिंसेविरोधात उत्तर दिले पाहिजे. प्रेमाने साद घातली, तर चांगला प्रतिसाद मिळतो. ‘फॅंड्री’ तील जब्या मी स्वतः होतो. हिंसा अपेक्षित नव्हती, तर चित्रपटात संथ गतीने सुरू असलेली हिंसा दिसत नाही, दगड दिसतो. गावागावांत जातीपातीविषयी भेदभाव, हिंसा आजही सुरू आहे. दररोजच्या जगण्यात आहे, ती गरजेची नाही. भेदभाव, हिंसा दररोजच्या जगण्यात आहे, ती गरजेची नाही.’ अश्या भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
त्यानंतर ते म्हणाले,व्यवस्थेत षडयंत्र आहेत. मान देण्याच्या नावाखाली पारंपरिक ओझी वाहायला लावली जातात. जर्मनीत हिटलरचे नाव घेऊ दिले जात नाही. कारण त्याने खूप हिंसा केली. भारतात जात संपवायचा विचार होतो, पण जातीवाद संपवला जात नाही. आरक्षण संपवले पाहिजे. महिलांना कुठेही दुय्यमच वागणूक आहे. तसेच जाणीव होणे, लेखन करणे, भूमिका घेणे आवश्यक आहे. माझ्या वाटचालीत अण्णा भाऊ, दया पवार, बाबुराव बागुल यांच्या साहित्याने खूप प्रेरणा दिली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.