बारामती : आम्ही चारवेळा उप-मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. कसं का होईना, पण चारवेळेस उप-मुख्यमंत्री झालो ना… भलेही माझ्या पद्धतीने झालो असेल. पण गंमतीचा भाग सोडा, म्हटलं साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले तर आपण चारवेळा उप-मुख्यमंत्री होऊ, अशा शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकेबाजी केली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डाची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, मागील पाच वर्षात बहिणीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. हे लोकशाही हे बरोबर नाही. तुमच्याकडे सरकार होते, तुमच्या विचाराचे सहकार मंत्री होते म्हणून तुम्ही जर यापद्धतीचे राजकारण करीत असाल तर हे चुकीचे आहे. आम्ही पण चार चार वेळेला मुख्यमंत्री पाहिलेलं कार्यकर्ते आहोत. चार वेळेला कसं का असेना पण उपमुख्यमंत्री झालो. साहेब चार वेळेला झाले मग आपण चार वेळेला का नको, असं अजित पवार म्हणताच सभेत कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. पुढे पवार म्हणाले, मित्रांनो आपण घरात बसलोय ,आपला एक परिवार आहे. सभेत थोडासा विनोद असावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.
यावेळी अजित पवार तब्बल एक तासाहून अधिक काळ सभेत मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना त्यांना ठसका लागला. त्यांनी भाषणातच शेजारील कार्यकर्त्यांकडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली. भाषण सुरू करताच अजित पवार म्हणाले, विरोधक म्हणतील पाणी पिस्तोवर बोलत होता. असे म्हणतात पुन्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला.
साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले, मी ही कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालोय, अजित पवार यांची फटकेबाजी