शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला या भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की हा करीम लाला नेमका होता तरी कोण? आपण या बातमीतून जाणून घेऊ हा करीम लाला कोण होता.
कोण होता करीम लाला?
अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं की आपल्यासमोर हाजी मस्तान किंवा दाऊद या दोघांची नावं येतात. मात्र करीम लाला हा मुंबई गुन्हेजगतातला पहिला डॉन होता. हाजी मस्तानही करीम लालाचा उल्लेख डॉन असाच करत असे.
करीम लालाचा जन्म १९११ मध्ये अफगाणिस्तानच्या कुनार मध्ये झाला. करीम लाला यास पश्तून समुदायाचा शेवटचा राजा असेही संबोधले जाई
साधारण १९३३-३४ च्या सुमारास करीम लाला मुंबईत आला. सुरुवातीला कुंटण खान्याला मुली पुरवण्याचा व्यवसाय त्याने केला. त्यानंतर तस्करी, जुगार या बेकायदा धंद्यामध्ये जम बसवण्यास करीम लालाने सुरुवात केली. करीम लाला गरजूंना मदतही करत असे. मात्र एक काळ असा होता की त्याच्या नावाने मुंबई अंडरवर्ल्ड चळाचळा कापत असे
पाकिस्तानातील पेशावरमधून करीम लाला मुंबईत आला होता. त्याने हिऱ्यांचीही तस्करी केली. १९४० पर्यंत करीम लालाची गुन्हे जगतावर पकड होती. तस्करीमध्ये त्याचा जम बसला होता. मुंबईत दारुचे गुत्ते आणि जुगाराचे अड्डेही करीम लालानेच सुरु केले.
४० च्या दशकामध्ये हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ लागलं. ज्यामुळे ४० च्या दशकानंतर करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन या तिघांचा प्रभाव होता.
करीम लाला आणि सिनेजगताचेही संबंध होते. अभिनेत्री हेलन ही एकदा मदतीसाठी करीम लालाकडे आली होती. हेलनचा एक मित्र पी. एन. अरोरा हेलनचे पैसे घेऊन फरार झाला होता. निराश झालेल्या हेलन यांनी दिलीप कुमार यांना फोन केला. त्यांनी तिला करीम लाला यास भेटण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी एक पत्रही करीम लालाला लिहिलं होतं. करीम लालाने या प्रकरणात लक्ष घातलं ज्यानंतर हेलन यांना त्यांचे पैसे परत मिळाले होते.